प्रत्येक ठिकाणी आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची एक पद्धत आपल्या कडे खूप पूर्वी पासून आहे. तर ही मंत्र पुष्पांजली म्हणजे नक्की काय आहे? तर आपले राष्ट्र कसे असावे, आपल्या राष्ट्रात काय असावे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांनी केलेली एक प्रार्थना असा अगदी सोपा अर्थ आपण काढू शकतोच.
प्रथम:
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवा स्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॥
या विश्वातील सर्व देवांनी विश्व कल्याणासाठी समर्पण भावनेने योगदान दिले आणि त्यामुळे धर्माचे प्रथम स्वरूप निर्माण झाले
आणि या सगळ्या देवांनी विश्व कल्याणासाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांच्या निवाससाठी स्वर्ग नावाचे स्थान मिळाले. अश्या प्रकारचे फळ आम्हाला मिळावे यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत.
द्वितीय:
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय।
महाराजाय नम: ।
आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा, कुबेरासारखा श्रीमंत, राज्यांचा ही राजा असा भगवंत त्याला नमन करतो.
आमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हे भाग्य आम्हाला मिळावे.
तृतीय:
ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।
पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकराळ इति ॥
आमचे कल्याण व्हावे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला असे साम्राज्य व स्वराज्य हवे जे उपभोग्य वस्तूंनी समृद्ध आणि योग्य रीतीने व्यवस्थित असेल. पण त्याचबरोबर, प्रत्येक गोष्ट किती प्रमाणात वापरली पाहिजे याचे शहाणपण व ज्ञानसुद्धा आम्हाला हवे आहे. अशा परमोच्च, श्रेष्ठ साम्राज्यावर आमचे अधिपत्य असावे.
चतुर्थ:
ॐ तदप्येषः श्लोकोभिगीतो।
मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥
आमची ही मनोकामना पूर्ण व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. वायुमंडळाने आच्छादलेले, जिथे जीवनदायी वायू आहे असे प्रचंड व व्यापक साम्राज्य आम्हाला प्राप्त होवो.
एकदंतायविष्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नौदंती प्रचोदयात् ।
हे गणेशा, तू एकदंत आणि वक्रतुंड आहेस. आम्ही तुझ्या ध्यानात राहतो. तू आमच्या बुद्धीला योग्य विचार, योग्य दिशा आणि प्रेरणा दे.
॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥